शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी याना मनी लाँडरिंग प्रकरणात अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यास ईडीने गवळी यांना सांगितले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी भावना गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला अटक करण्यात आली होती. त्यामुळे गवळींच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
भावना गवळी यांना ४ ऑक्टोबरला ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. आता ही मुदत संपत असून भावना गवळींना दुसऱ्यांदा ईडीने समन्स जारी केला आहे. येत्या २० ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.