राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आणि त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात सुद्धा आले. मात्र, आता पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या टास्क फोर्सची एक बैठक पार पडली असून तसा प्रस्ताव टास्क फोर्सने दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या काल राज्यातील टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करावे अशी भूमिका टास्क फोर्स ने मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये.
आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्यमंत्री यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. इतर राज्यात कोरोना रूग्णं संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.