राजुरा नगरपालिका काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवाळीनंतर नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपली रणनीती आखत आहे. राजुरा नगरपरिषदेचे सत्तांतर करण्यासाठी ‘काँग्रेस हटाव’ मोहिमेची रणनीती भाजपने आखलेली आहे. कॉंग्रेसला हटवण्यासाठी स्थानिक मित्र पक्षांशी युती करण्याचा कानमंत्र भाजपच्या स्थानिक नेत्यांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
मुनगंटीवार यांचा मंत्र चालल्यास तीन माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे दिवाळी अगोदरच राजकीय वातावरण तापलेले आहे. राजुरा नगरपालिकेत स्थापनेपासून सर्वाधिक कार्यकाळ सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. विद्यमान नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सर्वाधिक तीन वेळा नगराध्यक्ष पद भूषविले आहे. जनतेमधून दोनदा थेट निवडून आलेले आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची नाडी अरुण धोटे यांना चांगलीच माहिती आहे. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने व इतर पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे.
राजुरा नगरपालिकेत एकूण 18 सदस्यांपैकी विद्यमान नगर परिषदेमध्ये काँग्रेसकडे 9 सदस्य व 1 अपक्ष असे एकूण १० सदस्य आहेत. नगरपालिका सभागृहात काँग्रेसचे 9, भाजप चे 3 सदस्य, शेतकरी संघटना 4 व अपक्ष 2, असे पक्षीय बलाबल आहे. राजुरा नगरपालिकेच्या स्थापनेपासून सर्वाधिक कार्यकाळ पालिकेवर काँग्रेसचे सत्ता राहिलेली आहे. नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर यांनी कंबर कसलेली आहे.