गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाला रामराम केला आहे. आता ते पक्षाच्या विरोधातच मैदानात उतरले असून, यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पार्सेकर हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. ते भाजपच्या कोअर कमिटीचेही सदस्य होते. भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर पार्सेकर हे 2014 ते 2017 या काळात मुख्यमंत्री होते. ते पर्रीकरांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जात. पार्सेकरांना भाजपने तिकिट नाकारले होते. पार्सेकर यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पार्सेकर यांनी मांद्रेममधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता पक्षाच्या विरोधातच मैदानात उतरले आहेत. पार्सेकर यांनी म्हटले आहे की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला मंत्री अथवा मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला आमदार व्हायचे आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामे मला पूर्ण करायची आहेत. मी अपक्ष म्हणून मांद्रेममधून लढणार आहे.
दयानंद सोपटे हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी 2017 मध्ये मांद्रेममधून काँग्रेसच्या तिकिटावर लढून पार्सेकरांचा पराभव केला होता. नंतर काँग्रेसच्या इतर नऊ नेत्यांसोबत ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता पार्सेकरांना डावलून भाजपने सोपटेंना संधी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या पार्सेकरांनी थेट पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. सोपटे मतदारसंघातील मूळ भाजप कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप पार्सेकरांनी केला आहे. यामुळे मतदारसंघात सोपटे यांच्याबद्दल मोठी नाराजी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.