बीसीसीआय जागतिक क्रिकेटवर इतके वर्चस्व गाजवत आहे की त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही देश जाणार नाही. मात्र, त्यांच्या याच वर्चस्ववादी वृत्तीमुळे क्रिकेटचे नुकसान होत आहे, अशा शब्दात पाकिस्तानचे माजी कर्णधार व सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बीसीसीआयवर आगपाखड केली आहे.
बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. ते जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्या पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. पण भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही, असेही ते म्हणाले. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा यांनीही बीसीसीआयवर टीका केली होती.
बीसीसीआयने आयसीसीचा निधी रोखला तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कुलूप लागेल, असे मत व्यक्त केले होते आता त्यात इम्रान यांनीही समर्थन देत टीका केली आहे. पैसा सर्वात महत्त्वाचा आहे. बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. त्यामुळे कोणताही देश भारताविरोधात पाऊल उचलण्याचे धाडस करणार नाही, जे इंग्लंडने पाकिस्तानसोबत केले. केवळ खेळाडूच नव्हे तर विविध देशांच्या क्रिकेट मंडळाला बीसीसीआयकडून पैसे मिळतात. यामुळे बीसीसीआय जागतिक क्रिकेटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत आहे, असेही इम्रान म्हणाले.