अमरावतीमध्ये शहर पोलिस दलामधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आता महिला कर्मचार्यांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तास केली आहे. उद्या (24 सप्टेंबर) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अमरावती शहर पोलिस आयुक्तालया मध्ये 275 महिला पोलिस अंमलदारांना आरती सिंग यांच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
अमरावती पूर्वी नागपूर शहरामध्ये महिला पोलिसांना आठ तास ड्युटी देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिस घटकांनी याचा विचार करावा अशा सूचना दिल्या. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील असाच निर्णय घेत महिलांच्या ड्युटीमध्ये चार तासांची कपात करत 8 तास ड्युटी केली. त्यामुळे आता नागपूर, पुणे पाठोपाठ अमरावती या तिसर्या शहरात महिला अंमलदारांना 8 तास ड्युटीचा दिलासा मिळाला आहे.
महिला पोलिसांना ड्युटी बरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने त्यांना 12 तासापेक्षा अधिक वेळ करावंच लागतं. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे समोर आल्याने त्यांच्या ड्युटीमधून 4 तासांचा वेळ कमी करण्यात आला आहे. महिलांना चार तासांची सवलत मिळाल्याने आता अनेकींनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील आरती सिंग यांच्या निर्णयाचं स्वागत केले आहे.