गरज ही नवीन शोधाची जननी असते असे म्हटले जाते. भारतीय वंशाचे आणि अल्फाबेट या नामवंत सोफ्टवेअर कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबतीत हे वाक्य फारच लागू पडते. गुगल मॅप तयार करण्यासाठी त्यांना पत्नीबरोबर झालेल्या वादावादीतून प्रेरणा मिळाली होती तसेच गुगल ट्रान्सलेट साठी कारण ठरली चीनी भाषा. गुगलचे हे महत्वपूर्ण टूल दररोज सरासरी सुमारे ३ कोटी ४ लाख युजर्स कडून सर्च केले जाते आणि गेल्या १२ महिन्यात हा आकडा आणखी वाढला आहे.
जगभरातील १०८ भाषांचा अनुवाद चुटकी करण्याची सवलत देणारे हे टूल सुंदर पिचाई यांचीच देणगी आहे. एप्रिल २००६ मध्ये हे टूल सादर केले गेले त्यापूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने पिचाई चीन मध्ये होते. दिवसभर मिटींग्स असल्या तरी त्यांच्या मदतीला दुभाषा होता. पण जेव्हा ते एकटेच हॉटेल, टॅक्सी, दुकानात जायचे तेव्हा चीनी भाषा त्यांच्यासाठी चांगलाच अडथळा ठरत होती. चीन मध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या मुळात कमी त्यात अश्या सार्वजनिक ठिकाणी तर फक्त चीनीच बोलली जाते. आपण संवाद साधू शकत नाही यामुळे पिचाई वैतागले आणि त्यातून या शानदार टूलची कल्पना त्यांना सुचली.
चीनमध्ये बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाला हीच अडचण येत असणार असे लक्षात आल्यावर पिचाई यांनी ही समस्या समूळ सोडवायचा ध्यास घेतला. एखादी कल्पना डोक्यात आली की ती वास्तवात येईपर्यंत विश्रांती नाही हा त्यांचा स्वभाव. त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत आपल्या मुख्यालयात फोन करून २५ सोफ्टवेअर इंजिनीअर्सना चीन मध्ये बोलावून घेतले आणि अनुवाद करणारे टूल कसे तयार करायचे याचे धोरण ठरविले. कामाला सुरवात झाली आणि २००६ मध्ये हे टूल अस्तित्वात आले. त्यावेळी फक्त दुसऱ्या भाषांचे इंग्रजी अनुवाद होत असत पण आता १०८ भाषांचे कोणत्याही भाषेत अनुवाद होऊ शकतात.