महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. २३ नोव्हेंबरला दुपारी ४.१५ वाजता नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन होईल. २४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता ते अमरावतीला निघतील. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर राज्यपाल नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ येथे भेट देतील. त्यानंतर पापळ येथून यवतमाळकडे निघतील. यवतमाळ जिल्ह्यातील निलोना येथील दीनदयाल प्रबोधिनीला राज्यपाल भेट देतील व यवतमाळ येथे मुक्काम करतील.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ यवतमाळ येथील गोधनी रोडवरील प्रयास वन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल तसेच स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळी आयोजित प्रार्थना व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर इंग्रजी माध्यम शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण व आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते होईल. दुपारी ३च्या दरम्यान राज्यपालांचे यवतमाळ येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी तीनला मुंबईकडे जाण्यास निघतील.