अयोध्या: महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले असून, दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेने एक मोठी घोषणा केली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी अयोध्येत भव्य असे ‘महाराष्ट्र भवन’ बांधण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली.
शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बंधनकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर ही घोषणा केली. ते म्हणाले, शिवसेना आणि अयोध्येचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अयोध्या दौरा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. अयोध्येत जगभरातून लोक रामाच्या दर्शनाला येत असतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने लवकरच या ठिकाणी भव्य असे महाराष्ट्र भवन बांधण्यात येईल. या भवनात भाविकांना राहण्यासोबतच इतर सुविधा उपलब्ध केली जाईल.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याची चर्चा सध्या उत्तरप्रदेशात रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात शिवसेनेची ताकद दिसून यावी यासाठी आतापासूनच शिवसेनेकडून चाचपणी केली जात आहे. त्याचीच पहिली पायरी आदित्य ठाकरेंनी आजच्या दौऱ्याच्या माध्यमातून चढल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आणि त्याबाबतचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले आहे.