जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. या योजनेसंदर्भातील समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांसोबत व प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत बोलताना निराधार योजनेतील अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत बँकेत जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारीसंदर्भातही चर्चा झाली. शासकीय यंत्रणेने अधिक जलद गतीने सामाजिक आर्थिक योजनांची अंमलबजावणी करावी. नागरिकांकडून आलेल्या सूचनेनंतर सेतू कार्यालयामध्ये दोन विशेष कक्ष उघडण्यात आले आहे. या दोन कक्षामध्ये प्रलंबित प्रकरणाच्या दाव्यामधील अपूर्ण व चुकीचे कागदपत्र तपासले जात आहे. नागरिकांनी या लाभासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी. अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले.