तालिबानने अफगाणिस्थानचा कब्जा घेतल्यावर अमेरिकन सैनिकांनी दिलेल्या मुदतीच्या आधीच अफगाणिस्थान सोडला असून शेवटची सैन्य तुकडी रात्री १२ वाजता देशाबाहेर पडल्याचे पेंटागॉनने प्रथम जाहीर केले आहे. त्यानंतर राष्ट्रपती जो बायडेन यांनी मोठे विधान करताना अफगाणिस्थान मधील २० वर्षाचे अमेरिकी सैनिकांचे अस्तित्व संपल्याचे जाहीर केले आहे.
पेंटागॉनने अमेरिकी सैन्य वापसी पूर्ण झाल्याचे जाहीर करून शेवटचा अमेरिकी सैनिक बाहेर पडत असतानाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. हा शेवटचा सैनिक म्हणजे मेजर जनरल क्रिस डोन्ह्यू हे आहेत. ते सर्वात शेवटी सी १७ विमानात चढले. त्यांच्याकडे काबुलच्या अमेरिकी मिशनच्या अंताचे प्रतिक म्हणून पाहिले जात आहे.
५२ वर्षीय क्रिस यांना मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकी प्रमुख सैनिकी अभियानापूर्वी द. कोरिया आणि पनामा येथे तीन दशके सेवा देण्याचा अनुभव आहे. ते दोन स्टार जनरल आहेत आणि विशेष सेना दलांसोबत त्यांनी करियर मधील मोठा काळ काम केले आहे. अफगाणिस्थान, इराक, सिरीया, लिबिया व पूर्व युरोप संचालनाचे समर्थन करताना क्रिस याना १७ वेळा तैनात केले गेले आहे.
अफगाणिस्थान मधून अमेरिकी सैन्य वापसीचे अभियान गेले १७ दिवस सुरु असून इतिहासातील हे सर्वात मोठे एअरलिफ्ट अभियान असल्याचे सांगितले जात आहे. बेजोड साहस आणि संयम ठेऊन ते पार पाडले गेल्याचे पेंटागॉनचे म्हणणे आहे.