राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढले. भाजपने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीही आपणच मोठी आघाडी ठरल्याचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर बच्चू कडू यांनी आमिष घेतल्याचं सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण असा हल्लाबोल केला. आमिषाला बळी पडल्याचं सिद्ध करा, उद्या राजीनामा फेकतो, मला गरज नाही त्याची असं बच्चू कडू म्हणाले.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील, महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.
प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मतं आहेत, आमच्या उमेदवारा ९५३ मतं आहेत. याचा अर्थ असा आहे, कामं केलं नसती तर मतं मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मतं प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं. बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
बच्चू कडू काय म्हणाले?
अमोल मिटकरी हा मोठा माणूस आहे. त्यांनी काय आरोप केला आहे तो मोठा माणूस आहे. मी आमिष घेणारी औलाद नाही. दबावाला बळी पडणारा मी नाही. तिथे भाजपचा उमेदवार होता, त्यांनी मला समर्थन कसं दिलं ते मला माहिती नाही. त्यामुळे आमिष दाखवणं, बळी पडणं हे बच्चू कडूंची औलाद नाही. त्यांनी सिद्ध करावं, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं. हवेतले आरोप करु नयेत, हे बंद करा, असं बच्चू कडू म्हणाले. पेपरचं मला सांगू नका, कोणतं आमिष घेतलं हे सांगा, कोणता दबाव होता हे सांगा, हे बरोबर नाही, मी समजून घेतो म्हणजे काहीही बोलायचं का, मी सहन नाही करणार, चुलीत गेलं ते मंत्रिपद, अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही, तुम्ही महाविकास आघाडीत आहे की नाही याच्याशी मला देणंघेणं नाही, कोणतं आमिष दाखवलं ते सिद्ध करा, तुम्ही मला प्रश्न विचारु शकत नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.