सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम मे. न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने आम्हाला पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात काम करण्यासाठी आरोग्य विभागास अधिक सक्षम करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागात भरती करण्याकरिता शनिवार २५ सप्टेंबर आणि रविवारी २६ सप्टेंबर रोजी शासनाकडून परीक्षा घेण्यात येण्यात होती. पण ती रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून पदांच्या भरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. त्याकरिता प्रवेशपत्र परीक्षार्थींना दिले जाते. त्यात परीक्षा देणाऱ्याचे नाव, परीक्षा केंद्र, परीक्षेचे वेळ, परीक्षा दिनांक, तसेच परीक्षे संबंधी इतर माहिती त्यात दिलेली असते. पण घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत शासनाने चांगलाच घोटाळा करून ठेवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा उमेदवारांना फक्त महाराष्ट्राबाहेरील केंद्र आले नसून चक्क देशाबाहेरील परीक्षेचे केंद्र मिळाले आहे. उमेदवारांना चीन देशातील परीक्षेसाठी केंद्र मिळाले आहे. कोणाला उत्तर प्रदेश नोएडा अशी ठिकाण मिळाली आहे, तर कोणाला अर्धाच परीक्षा केंद्राचा पत्ता आला होता.
सर्व उमेदवारांना परीक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत विभागाकडून निवेदनाद्वारे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच गट- क व गट-ड संवर्गाची परीक्षा लवकरच घेण्यात येईल. हा निर्णय सर्व उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावरून, वैयक्तिक संपर्क क्रमांकावर संदेश तसेच ई-मेलद्वारे कळवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, गट-क आणि गट-ड अशा ६२०५ जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली होती. या जागा भरत असताना त्यासाठी परीक्षा घेण्याचे काम बाह्य संस्थेला देण्यात आले होते. या परीक्षेसाठी अंदाजे ८ लाख परीक्षार्थींनी नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ही देण्यात आले होते. मात्र या ज्ञासा संस्थेने आपल्याला परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागेल, असे कारण पुढे केल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली.
यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आपल्याला याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावरून मिळेल. त्याचप्रमाणे जिल्हा केंद्रावर देखील आपल्याला माहिती मिळू शकेल. परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याच वेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.