अमरावती : जिल्ह्यात जोरदार गारपीट झालीय. दर्यापूरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक एवढ्या जोरात पाऊस आला की शहरात अक्षरशः भीती पसरली. दर्यापुरातल्या वैभव मंगल कार्यालयात दोन लग्नसमारंभ सुरू होतं. जोरदार पाऊस आल्यानं या मंगलकार्यालयाचं छतच उडून गेलं. छत उडून गेल्याने सात ते आठ वऱ्हाडी जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीय.
शेतमालाचं मोठं नुकसान
दरम्यान या जोरदार पावसानं उन्हामुळे वैतागलेल्या नागरिकां मोठा दिलासा मिळाला. मात्र शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. व्यापाऱ्यांचा शेतमालही भिजला. कुठलीही चिन्हं नसताना अचानक पाऊस आला आणि शेतमालाचं लाखोंचं नुकसान करुन गेला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळलं
वर्धा शहरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली. यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलमोहरचं मोठे झाड ही कोसळलं. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. एवढंच नव्हे तर या झाडाखाली पाच दुचाकी दबल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.