नवी दिल्ली: हरयाणा मध्ये इंद्रप्रस्थ क्रीडांगणावर खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 ची सोमवारी यशस्वी सांगता झाली. एकूण 137 पदकांसह (52 सुवर्ण) यजमान हरयाणा गुणतालिकेत अव्वल स्थानावर आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र (125 पदके – 45 सुवर्ण) आणि कर्नाटक (67 पदके – 22 सुवर्ण) अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिले.
समारोप समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हरयाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यासह हरयाणातील इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
क्रीडास्पर्धांच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष संदेश पाठवला. “कित्येक वर्ष देशाच्या प्रतिभावान खेळाडूंनी विविध व्यासपीठांवर अनेक क्रीडाप्रकारात केलेल्या कामगिरीने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. या सर्व खेळाडूंची प्रतिभा आणि कामगिरी हे जागतिक स्तरावर 21व्या शतकातील भारताच्या सतत वाढणाऱ्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे.”
“आज देशाच्या युवा खेळाडूंच्या आशा-आकांक्षा निर्णय आणि धोरणांचा आधार बनत आहेत. नवीन राष्ट्रीय धोरणात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाविषयक आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयाने देशात उच्च क्रीडा संस्कृती आकार घेत आहे. क्रीडाक्षेत्रात अंगभूत गुण ओळखून, प्रतिभा आणि नैपुण्याच्या जोरावर निवड आणि प्रशिक्षणापासून खेळाडूंच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकार देशातील प्रतिभावान तरुणांच्या पाठीशी आहे. देशाच्या प्रत्येक भागातल्या युवा खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि एक भारत श्रेष्ठ भारत मंत्राला अधिक सामर्थ्य प्रदान केले.
युवावर्गाने खेळाच्या मैदानात त्यांच्यातील जोश द्विगुणित करून देशाचा सन्मान आणि आदर अधिकाधिक उंचीवर न्यावा अशी आमची इच्छा आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.