राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जगजीत सिंह यांची बैठक मंत्रालयातील कार्यालयात बोलावली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते नेमके कुठे आहेत? याचा शोध घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावली असून, दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना याबाबत शोध घेण्यासंदर्भात सूचना केली असल्याची माहिती समोर येत आहे.
परमबीर सिंह यांचा कसून शोध सुरू
सेवा नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाअंतर्गत राज्य सरकारने परमबीर सिंह यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही या नोटीस संदर्भात त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच ते नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीही माहिती नाही.तसेच परमबीर सिंह यांनी देशातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विमानतळावर अटक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त नेमके गेलेत कुठे याचा आता कसून शोध राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयासोबत चर्चा सुरू –
परमबीर सिंह देशाबाहेर गेले आहेत, अशा बातम्या बाहेर येत आहेत. या प्रकरणावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या प्रकरणावर केंद्रीय गृह मंत्रालयाशी बोलणे सुरू असून, परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सिंह हे सरकारी अधिकारी असल्याने, जर त्यांना कुठेही जायचे असेल तर ते सरकारच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही, असे असूनही, जर ते देशाबाहेर गेले असतील तर ही चांगली गोष्ट नाही. महाराष्ट्र सरकार त्यांना शोधत आहे. त्यानंतर काय करायचे ते ठरवले जाईल. त्यांच्याविरोधात विविध विभागीय कारवाई केली जाईल, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ड्युटीवर प्रथम परत यावे आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.