उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ईश्वराच्या साक्षीने त्यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रादेहाचे मुख्यमंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी ही शपथ दिली आहे. लखनौ येथील इकाना स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय स्मृती इराणी या सर्व नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. तर यांच्यासह इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत.
या व्यतिरिक्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासहीत भाजपाचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. तर उत्तर प्रदेशातील हजारो नागरिकांची या सोहळ्याला उपस्थिती लाभली आहे.
या सोहळ्यासाठी भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले असून मैदानात मोठी रांगोळी काढण्यात आली आहे. ‘नये भारत का, नया उत्तर प्रदेश’ या थीमला घेऊन संपूर्ण सजावट करण्यात आली आहे.