मी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने जाणवूच दिलेलं नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या प्रचारामुळे गाजलेले आणि प्रचंड टीका झालेले देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत हे वाक्य बोलून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
‘पाटीलसाहेब आणि गणेश नाईक आहेत. तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी आशीर्वाद घ्यायला इथेच येणार आहे’
नवी मुंबईत महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या नवरात्रोत्सव गोवर्धनी मातेच्या दर्शनाला देवेंद्र फडणवीस आले होते. नवी मुंबई शहरातील कामाचे कौतुक करत त्यांनी देशातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचा गौरव फडणवीस यांनी करत आगामी मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकत युवक जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्या नवरात्र उत्सवास आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या निमंत्रणावरून वाशी येथे फडणवीस यांनी भेट दिली