राजनाथ सिंह यांच्यावर ओवैसींची टिका
हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. तर, राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सडकून टीका केली आहे.
“हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवती,” अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी राजनाथ सिंह आणि भाजपवर केली आहे.
“सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो.
तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते,” असे राजनाथ सिंह म्हणाले.