कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. उद्याच दहीहंडी असून मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीहंडी होणारच असा निर्धार केला आहे.
आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. ‘जर ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये दहीहंडी फोडू,’ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान, ‘आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का ?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करत संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला होता.