शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा संतप्त सवाल
नागपूर: विदर्भ व मराठवाड्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आजपासून (दि २२ मार्च) नापुरातून सुरूवात झाली असून विदर्भाच्या तीन दिवसीय दौ-यावर शिवसेना नेते संजय राऊत आले असून त्यांनी प्रसार माध्यमांशी आज संवाद साधला. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घाणाघाती टीका केली. शिवसेनेला जनाब सेना म्हटले जाते तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाब संघ म्हटले तर चालेल का? असा संतप्त सवालही राऊत यांनी केला.
ते म्हणाले की, भारतात २२ कोटी मुसलमान राहतात. त्यातले हजारो मुस्लिम भाजपाला आणि आम्हालाही मतदान करत असतील. नागपूरमध्ये आरएसएसचं मुख्यालय आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारी ती एक संघटना आहे. अनेकवेळा मी त्यांच्याकडे आदराने पाहतो. पण आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम समाजाविषयी काही वक्तव्ये पाहिली तर त्यांनाही जनाब सेना म्हणणार का?
अनेकदा त्यांनी सांगितले की, मुस्लिम व हिंदूंचा डीएनए सारखाच आहे म्हणून ते जनाब सेना झाले का? आरएसएसचा राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन केला म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का? तुम्ही अल्पसंख्याक सेल का काढला आहे? मग तुम्हाला मियाँ, खान म्हणायचे का? देशात कोट्यवधी मुस्लिम राहतात. अनेक राज्यपाल मुस्लिम आहेत. फक्त धार्मिक विद्वेष करून राजकारण करत असाल तर तुम्ही रोज फाळणी करत आहात, असेही संजय राऊत म्हणाले.
भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेची सातत्याने जनाब सेना म्हणून खिल्ली उडविली जात असल्यामुळे शिवसेनेचा संताप होत आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी शिवसैनिकांशी संवाद साधताना जनाब सेनेवरून संताप व्यक्त केला होता. आता शिवसेना खासदार संजय राऊतही त्यावरून उखडले आहेत. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेला जनाब सेना म्हटले जाते तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाब संघ म्हटले तर चालेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असे म्हणणारे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेला जनाब सेना म्हणत भाजपाने त्यांना वेळोवेळी लक्ष्य केले होते. जातीचे व धर्माचे राजकारण करणे हा आमचा पींड नसून देशसेवा करण्यासाठी शिवसेना प्रमुखासोंबत आम्ही कायम असल्याचेही यावेळी राऊत म्हणाले.