गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात… अमुक तमुक… चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे ती एजन्सी चौकशी करेल की नाही की दुसरं कुणी करेल असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला.
पत्रकारांनी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचा प्रश्न विचारला असता जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याचपध्दतीने ते आरोप करत आहेत.त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसता बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो असंही ते म्हणाले.
याप्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केलीय. यामध्ये एक-दोन कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेलेले नाहीत तर त्याचा जवळपास आकडा ६०-७० पर्यत असू शकतो आणि त्यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत असेही अजित पवार म्हणाले.