आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी एलन मस्क फाऊंडेशनकडून XPRIZE कार्बन रिमूव्हल माइलस्टोनसाठी घेतलेल्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रीनाथ अय्यर आणि त्याच्या टीमला अडीच लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 1 कोटी 85 लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर 195 संघांपैकी, दहा देशातील 23 विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. काल ही घोषणा ग्लासगो येथे सुरु असलेल्या COP-26 मधील सस्टेनेबल इनोव्हेशन फोरम या कार्यक्रमात करण्यात आली आहे. दरम्यान, मागील 4 वर्षांपासून मस्क फाऊंडेशन आणि एक्सप्राइजकडून हा पुरस्कार जगातील कार्बन नष्ट करण्याबाबत संशोधन करणाऱ्यांना दिला जात असतो.
आयआयटीच्या श्रीनाथ अय्यर (पीएचडी विद्यार्थी), अन्वेषा बॅनर्जी (पीएचडी विद्यार्थी), सृष्टी भामरे (बीटेक + एमटेक) आणि शुभम कुमार (ज्युनियर रिसर्च फेलो-अर्थ सायन्स) हा भारतातील एकमेव संघ असून ज्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. दरम्यान प्राध्यापक अर्णब दत्ता म्हणाले की, पृथ्वीच्या तापमानात सुमारे 1.1 अंश सेल्सिअस वाढ औद्योगिकीकरणानंतर CO2 पातळीत वाढ झाली आहे. यात योगदान देणारी काही प्रमुख क्षेत्रे म्हणजे ऊर्जा, पेट्रोलियम, पोलाद, खते आणि सिमेंट उद्योग. आमच्या संकल्पनेमुळे विद्यमान उद्योगांमध्ये CO2 उत्सर्जन त्याच्या स्रोतावर मर्यादित ठेवण्यासाठी समाविष्ट केली जाऊ शकते.
संस्थेतील पृथ्वी विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय कार्यक्रम इन क्लायमेट स्टडीज विभागाचे प्राध्यापक विक्रम विशाल यांनी सांगितले की, कार्बन डाय ऑक्साईडला त्याच्या स्त्रोतावर (उद्योगांमध्ये) कॅप्चर करणे आणि नंतर भविष्यातील वापरासह कार्बोनेट क्षारांमध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या आमच्या शोधामुळे पुन्हा एकदा ते वायू CO2 म्हणून वातावरणात प्रवेश करू नये अशी व्यवस्था केली आहे.