विधानपरिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघात निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल लागला असून यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. पण, काँग्रेसने वेळवेर उमेदवार बदलत धक्का दिलेल्या रवींद्र भोयर यांना मात्र स्वतःच्याच मतावर समाधान मानावं लागलं.
काँग्रेसने भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र भोयर यांना आयात करत उमेदवारी दिली होती. आपल्याकडे काँग्रेसचे काही नगरसेवक असून त्यांच्या मतांचा काँग्रेसला फायदा होईल, असा दावा भोयर यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेसला देखील विजयाची आशा वाटू लागली. कदाचित त्यामुळे त्यांना भोयर यांच्यावर विश्वास ठेवत काँग्रेने भोयर यांना उमेदवारी दिली. मात्र, भोयर हे प्रचारामध्ये सक्रीय दिसले नाही. त्यांनी ना कुठल्या नगरसेवकांची भेट घेतली आणि ना प्रचार केला. त्यामुळे निवडणूक मॅनेज होणार की काय? अशी भीती काँग्रेसला वाटत होती. परिणामी काँग्रेसने मतदानाच्या आदल्या रात्री पत्रक काढत उमेदवार बदलला. रवींद्र भोयर यांचा पाठिंबा काढून त्यांनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला.
रवींद्र भोयर यांना फक्त १ मत
नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली आहेत, तर काँग्रेसने वेळेवर पाठिंबा दिलेल्या मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली. त्यांना फक्त १ मत म्हणजेच स्वतःच्या मतावर समाधान मानावे लागले.
काँग्रेसची मत फुटली?
काँग्रेसचे एकूण २१० नगरसेवक होते. मात्र, काँग्रेसचा पाठिंबा असलेला उमेदवार मंगेश देशमुख यांना फक्त १८६ मते प्राप्त झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे २४ मते फुटल्याचे दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसचे एकूण ४४ मते फुटल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.