गडचिरोली: विदर्भातील आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणा-या गडचिरोली जिल्हातील पोलींसावर त्वरीत उपचार करता यावेत; तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्हात ट्रॉमा केअर सह सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतुद करण्यासोबतच तिथे तज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यासोबतच जिल्हात जलद प्रवास करता यावा तसेच कोनसरी लोहखणीच प्रकल्पाला मदत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हात विमानतळ आणि गडचिरोली- कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देखील पवार यांनी या बैठकीत दिले.
गडचिरोली जिल्हातील विविध प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात एक विशिष्ट बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नगर विकास मंत्री तथा गडचिरोल चे पालकमंत्री एकनाथ शिंदे,गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हा अधिकारी धनाजी पाटील, दूरदृष्टप्रणाली मार्फत उपस्थित होते, तर सार्वजनीक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ प्रदिप व्यास, अप्पर मुख्य सचिव नियोजन नितीन गद्रे, प्रधान सचिव नागरी विमान श्रीमती वल्सा नायर, वित्तीय सुधारणा सचिव श्रीमती ए शैलेजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्हात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आणि त्यात जखमी होणाऱ्या पोलिसांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्हात सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची आवश्कता असल्याचे मत व्यक्त केले. याठिकाणी लष्कराच्या धर्तीवर दीडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणि त्यातील पन्नास खाटा या ट्रॉमा केअर साठी राखीव ठेवाव्यात असे यावेळी निश्चित करण्यात आले. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालय सिटि स्कँन, एमाआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात. याठिकाणी नेमणुक करुन देतांना डॉक्टरांना विशेष पैकेज देवून तज्ञ स्टाफची नेमणूक करण्यासाठी गडचिरोली येथील जिल्हाधिका-याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर तज्ञ लोकांचा समावेश करावा असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
दोन एकर जमिनीवर विमानतळ
गडचिरोली जिल्हातील दळणवळण अधिक गतीमान व्हावे यासाठी जिल्हात सुमारे दोनशे एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे श्रीमती वल्सा नायर यांनी सांगितले. तर विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटि कडुन शक्यता ( फिजीबिलीटी) तपासून घेऊन यासाठी लागणारी तांत्रिक पाहणी करण्यासाठी नागपूर येथुन तज्ञ व्यक्ती पाठविण्यात येईल असे श्री कपूर म्हणाले. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.