राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसू नये म्हणून राज्यातील शाळा देखील बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाचा देखील वेग वाढवण्यात आला होता.
मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आला होता. आता या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात एकूण ५.५३ लक्ष विद्यार्थ्यांपैकी ३.०९ लक्ष विद्यार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, येत्या १ फेब्रुवारी पासून पुणे जिल्हा क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. १५ ते १७ वयोगटातील एकूण लाभार्थीपैकी ५६ टक्के बालकांना कोवॅक्सीन लसीची पहिली मात्र दिली गेली आहे. ३ मार्चला त्यांना दुसऱ्या मात्रेची तारीख देण्यात आली आहे. येत्या महिना अखेरीस आम्हाला सर्व शालेय विद्यार्थ्यांना लसवंत करण्याचा प्रयत्न आहे. असे आरोग्यविभागाचे डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ८३.४२ लक्ष नागरिकांना एकूण १.६१ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ७०.७७ लक्ष (८५%) नागरिकांना दोनही मात्र प्राप्त झाल्या आहेत.