अमेरिकेत सध्या वेगाने फैलावत असलेल्या करोनाने लहान मुलांना विळख्यात घेण्यास सुरवात केली असून ही जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अॅकॅडमी ऑफ पेडीअॅट्रिक्सच्या ताज्या अहवालानुसार गेल्या आठवड्यात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान १,४१,९०५ मुले करोना संक्रमित झाल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण ३२ टक्के वाढले आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात करोना संक्रमितांच्या एकूण संखेत मुलांची संख्या १/३ असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे. अमेरिकेत एकूण लोकसंख्येत लहान मुलांचे प्रमाण २२ टक्के आहे. संक्रमित मुलांचे प्रमाण ३ टक्के असून ६८ लाख मुले संक्रमित झाली आहेत. अर्थात लहान मुलांमध्ये करोना मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे.
अमेरिकेच्या सहा राज्यात करोनामुळे एकही मुलाचा मृत्यू झालेला नाही. संक्रमित मुलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वेळोवेळी मुलांना इंफ्ल्यूएन्झा, मेनिन्जायटीस, गोवर, हेपिटायटीस लसी दिल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर मध्ये ५ ते ११ वयोगटातील ८३०० मुले रुग्णालयात दाखल होती त्यातील १७२ मुलांचा मृत्यू झाला. करोनाचा प्रसार वेग अधिक असल्याने शाळा बंद केल्या गेल्या. त्यामुळे १२ लाख मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम दिसून आला. शाळा पुन्हा सुरु झाल्यावर पुन्हा करोना प्रसार वेग वाढला असून आता सर्व वयोगटातील मुलांमध्ये करोना संक्रमण दिसून येत आहे.