आयकर विभागाने एका रिक्षाचालकाला 3 कोटी रुपयांचे भरण्याची नोटीस धाडली आहे. हे ऐकून थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील असून मथुरेतील एका रिक्षाचालकाला आयकर विभागाने पाठवलेली 3 लाखांनी नोटीस पाहता धक्काच बसला आहे. घाबरलेल्या रिक्षाचालकाने पोलिसांकडे धाव घेत त्याला मदत करण्याची विनंती केली आहे.
मथुरा येथील बाकलपुर परिसरातील अमर कॉलनी मधील स्थानिक प्रताप सिंह याला आयकर विभागाकडून नोटीस आल्यानंतर त्याने पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रताप सिंह रिक्षाचालक आहे. परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही केस दाखल केलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
प्रताप सिंह याने सोशल मीडियात एक व्हिडिओ अपलोड केला असून त्याने नेमके काय प्रकरण आहे त्याबद्दल सांगितले आहे. त्याने असे म्हटले की, 15 मार्चला बाकलपुर येथे जन सुविधा केंद्रात पॅनकार्ड बनवण्यासाठी अर्ज केला होता. कारण बँकेने त्याला पॅन कार्ड लागेल असे सांगितले होते. जन सुविधा केंद्रातून प्रताप याला त्याचे पॅन कार्ड एका महिन्यात येईल असे सांगितले गेले. मात्र ते आलेच नाही. पण नंतर त्याला कळले की. त्याचे पॅन कार्ड हे संजय सिंह नावाच्या व्यक्तीला दिले गेले.
याच दरम्यान प्रताप सिंह हा सातत्याने केंद्रावर पॅन कार्डसाठी जात होता. अखेर त्याला पॅन कार्डाची कलर प्रिंट दिली गेली. खरंतर रिक्षाचलकाला निरक्षर असल्याने त्याला कळले नाही की पॅन कार्ड सत्य आहे की फोटोकॉपी आहे. प्रताप याला जेव्हा आयकर विभागाकडून फोन आला तेव्हा त्याचे हातपाय थरथरु लागले.
प्रताप सिंह याला आयकर विभागाने 3,47,54,869 रुपये भरण्यास सांगितले आहे. प्रताप याने सांगितले की, त्याला अधिकाऱ्यांनी म्हटले त्याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने पॅन कार्ड घेतले असून जीएसटी क्रमांक तयार केला आहे. या पॅन कार्डवर जवळजवळ 43.44 कोटी रुपयांचा टर्नओवर एकाच वर्षात केला आहे. अधिकाऱ्यांनी प्रताप सिंह याला सल्ला दिला की, त्याने या प्रकरणी एफआयआर दाखल करावा आणि आरोपीला शिक्षा मिळवून द्यावी. सध्या या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.