रशिया आणि युक्रेतन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघांनी तत्काळ बैठक बोलावली. रशियाने युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा मसुदा ‘व्हेटो’ केला आहे. सुरक्षा परिषदेत अनेक देशांकडून रशियाच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रसंघाने रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, भारताने सावध पवित्रा घेत संपूर्ण प्रकरणात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या आक्रमणाविरोधात ठराव मांडण्यात आला. या ठरावावर सार्वमत घेण्यात आले. त्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांनी बहिष्कार टाकला. भारत आणि चीनसोबतच संयुक्त अरब अमिरातीनेही या ठरावावर बहिष्कार टाकला आहे. याआधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने दोनही देशांना शांतता ठेवण्याचे आणि युद्ध टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर भारताने कोणताही आक्रमक पवित्रा घेतला नाही.