रातुम नागपूर विद्यापीठाचा पुढाकार
नागपूर : स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात सुरु होणारा शताब्दी महोत्सव तसेच यंदाच्या खेलो इंडिया विद्यापीठ योगासन स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचे सुवर्ण कामगीरीचे औचित्य साधून यंदाचा ‘जागतिक योग दिवस’ धावत्या मेट्रोत साजरा करण्याचा निर्णय रातुम नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला आहे.
‘माझी मेट्रो’ आणि नागपूर विद्यापीठाचे ‘क्रीडा विभाग’ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन २१ जून रोजी सकाळी पावणे आठ वाजता करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ फ्रीडम पार्क झिरो माईल येथून होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, डीआरएसएस सुनील माथुर, प्रकल्प संचालक महेश कुमार, कार्यकारी संचालक उदय बोरवणकर, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे आदी उपस्थित राहणार आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने ७५ मिनिटे ‘योगा ऑन व्हील’ अशी थीम या कार्यक्रमाची आहे. विद्यापीठाच्या विविध प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे नामवंत खेळाडू, शहरातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त, रासेयोचे स्वयंसेवक, विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी, विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सहा ते ६० वर्षापर्यंतच्या नागरिकांची उपस्थिती यावेळी राहणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने होऊन, सभा प्रथम प्रार्थना त्यानंतर सूक्ष्म व्यायाम व योगासने, त्यानंतर शिथिलीकरण व्यायाम आणि शेवटी प्राणायम व शांती मंत्र असे कार्यक्रमाचे स्वरुप आहे. विद्यापीठाच्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षक पल्लवी खंडाळे यावेळी पूर्ण भारतीय पारंपारिक वेशात नॉन- स्टॉप ७५ मिनिटे विविध योग प्रात्याक्षिके सादर करणार आहे. तसेच जागतिक व आशियाई योगासन स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक विजेती धनश्री लेकुरवळे ही सुद्धा विद्यापीठाची खेळाडू म्हणून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.
विद्यापीठाच्या योगा चमूसह फुटबॉल, कराटे, बॅडमिंटन, बास्केटबॉल अॅॅथलेटिक्स, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक या खेळांचे प्रशिक्षणार्थी खेळाडूही प्रामुख्याने यात सहभागी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. डॉ. सोपानदेव पिसे विद्यापीठाच्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रशिक्षक युगबहादूर छेत्री हे कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.