तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची गरज
-टेकडीवर आढळले तीन स्तुप भदंत ससाई यांची माहिती.
नागपूर: उपराजधानीलगत मनसरच्या उत्खननात बौद्धकालीन अवशेष मिळाल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र या ठिकाणी आढळलेल्या स्तुपाच्या आत काय दडले आहे, हे रहस्य अद्यापही कायम आहे. कारण स्तुपाच्या आत उत्खननच झाले नाही. तांत्रिक पद्धतीने शोध घेतल्यास स्तुपाच्या आतील रहस्य जगासमोर येईल, अशी माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष, बोधीसत्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी इंदोरा बुध्दविहार येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
जमिनीपासून 300 ते 500 फूट उंचीवर असलेल्या टेकडीखाली बुद्धनगरी आहे. दोन हजार 200 वर्षांपूर्वीचा बौद्धकालीन इतिहास या टेकडीखाली गडप झाला असावा, अशी नोंद इंग्रजांनी केली होती. याबाबत माहिती भदंत ससाई यांना असल्यामुळे त्यांनी 30 वर्षापूर्वी 1992 मध्ये स्व:खर्चातून मनसर परिसरात उत्खनन केले. 1992 ते 2002 पर्यंत दहा वर्षांत उत्खनन केले. 60 एकरच्या परिसरात ए आणि बी अशा दोन भागांत उत्खनन झाले.
टेकडीच्या वरचा भाग म्हणजे बौद्ध स्तुप. उत्खननात तीन मोठे आणि एक लहान स्तुपही आढळला होता.
स्तुपाच्या आत जाण्यासाठी एक मार्ग असून पायर्या आहेत. ससाई स्वत: त्या मार्गापर्यंत गेले. सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळे आतील भागात अंधार दाटलेला आहे. स्तुपाची लांबी किती? कुठपर्यंत मार्ग जातो? आत काय आहे? याची माहिती आवश्यक आहे. स्तुपाच्या आत तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी मिळू शकतात, असा अंदाज ससाई यांनी वर्तविला आहे. त्यासाठी तांत्रिक पद्धतीने म्हणजे व्हिडीओ कॅमेरा असलेल्या मशीनच्या माध्यमातून स्तुपाच्या आत पाहता येईल. आतील भागाचे चित्रीकरण करून स्क्रीनवर पाहिल्यानंतर या ठिकाणी उत्खनन करण्याची गरज आहे काय? याचा अंदाज बांधता येईल. या परिसरात खदान आहेत. त्यामुळे बौध्द स्तुपाच्या खालीसुद्धा खनिज संपत्ती असावी, असा अंदाजही ससाई यांनी वर्तविला आहे. तसेच स्तुपाच्या खालच्या भागातही एक प्रवेशद्वार असून भुयारी मार्ग आहे. याठिकाणी असलेल्या भलामोठ्या दगडावर नागलिपीत कोरलेले आहे. तो मार्गसुद्धा आत म्हणजे खालच्या आणि वरच्या भागात जातो. त्यामुळे आत काय दडलेले आहे, याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.
जपानच्या शिष्टमंडळाने ससाई यांच्या उपस्थितीत 2015 मध्ये पुरातत्व विभागाला निवेदन देऊन स्तुपाचे रहस्य जाणून घेण्यासाठी तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची विनंती केली होती. पुरातत्व विभागाने एक बैठकही बोलाविली. मात्र एका निवृत्त अधिकार्याने उत्खनन पूर्ण झाल्याचे सांगितल्याने परवानगी नाकारण्यात आल्याचे ससाई यांनी सांगितले.
1992 ते 2002 पर्यंत उत्खनन
मनसर टेकडी परिसराच्या उत्खननाबाबत भदंत ससाई यांनी तत्कालीन खासदार तेजसिंगराव भोसले यांच्याशी चर्चा केली होती. भोसले यांच्या माध्यमातून तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुन सिंग यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यांनी उत्खननाच्या कार्याला मंजुरी दिली. तसेच केंद्रीय पुरातत्व कार्यालयाचे निवृत्त अधिकारी जगतपती जोशी आणि ए. के. शर्मा यांच्या उपस्थितीत उत्खनन होईल, असे निर्देश दिले. त्यानंतर 1992 ते 2002 पर्यंत उत्खनन झाले.
कमळ पाकळ्यांचा स्तुप
उत्खननादरम्यान स्तुपाचा वरील भाग हा कमळाच्या पाकळ्याच्या आकाराचा होता. सुरक्षाअभावी आणि वातावरणामुळे स्तुपाच्या पाकळ्या तुटल्या. कालांतराने जगतपती जोशी यांनी डागडुजी करून पाकळ्या मूळ स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका मोठ्या दगडाने स्तुप झाकलेला होता. जोशी यांनी तो दगड हटवून आत डोकावून पाहिले? नंतर मजुरांच्या हाताने लगेच तो दगड ठेवून बंद केल्याचे ससाई सांगतात. याठिकाणी 50 फूट खोलपर्यंत उत्खनन केल्यास बुद्धाचे अवशेष मिळतील, असे शर्मा यांनी सांगितल्याचे ससाई सांगतात.
उत्खननात आढळल्या अडीच हजार मूर्ती
मनसर परिसरात उत्खनन झाल्यानंतर प्राचीन इमारती, भिक्खु निवास, बौद्ध विद्यापीठ, बुद्धविहार, 2,766 मूर्ती, शीर नसलेल्या मूर्ती, तुटलेला कलश, सातवाहन काळातील वस्तु, बुद्धकालीन अवशेष आढळले होते. याठिकाणी आढळलेल्या अस्थि नागार्जुनांच्या होत्या, असा दावा ससाई यांनी केला.