शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली असून यंदाचा मेळावा हा सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. या मेळाव्यात 50 टक्के उपस्थिती असणार असून यामध्ये सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा करोनामुळे गेल्या वर्षी झाला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता. मात्र आता करोनाची परिस्थीती सुधारत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा साजरा करण्यात येणार आहे.
करोनाचे संकट ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे सांगत दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.