जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणा-या जपानमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून गेल्या चाळीस वर्षातील सर्व रेकॉर्ड महागाईने मोडीत काढले आहेत. महागाई वाढल्याने जपानमधील सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जपानी वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार जपानमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात.
मात्र सध्या जपानी चलन असलेल्या येनचे मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये घसरले आहे. चलनामध्ये झालेल्या घसरणीमुळे आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थसत्ता असलेला जपान संकटात सापडला आहे.
साठेबाजीची होण्याची शक्यता
इकोनॉमिक रिसर्च इंस्टीट्यूटच्या प्रमुख असलेल्या अत्सुशी टाकेडा यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, सध्या वाढती महागाई ही जपानमधील एक प्रमुख समस्या बनली आहे. महागाईने गेल्या चाळीस वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने साठेबाजीची शक्यता नाकारता येत नाही. व्यापाऱ्यांनी वस्तूंची साठेबाजी केल्यास, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत महागाई आणखी वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वाढत्या महागाईबाबत सरकार गंभीर असून, ती कमी करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जात असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.