नागपूर शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिटिझन्स फोरमने (सामाजिक संस्था) ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अनोखे आंदोलन केले. फोरमच्या कार्यकर्त्यांनी शहरातील खड्ड्यांना महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकार्यांची नावे दिली आहेत.
मानस चौक व सदर येथील माउंट रोड परिसरात हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
मानस चौक येथील खड्ड्याला नागपूरचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी यांचे नाव देण्यात आले आहे तर लोहापूल परिसरातील खड्ड्यांना स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांची नावे देण्यात आलीत.
तर माउंट रोड सदर येथील खड्ड्याचे नामकरण मनपा आयुक्त यांचे नावे करण्यात आले आहे.
सिटिझन्स फोरमच्या सदस्यांनी मानस चौक व सदर मार्गावरील खड्ड्यांभोवती चुन्याने रेखांकन करीत या खड्ड्यांची हार फुल आणि अगरबत्ती ओवाळून पूजा केली व नारळ फोडत या खड्ड्यांचे नामकरण केले.
यावेळी “नागपूर तूला एनएमसीवर भरोसा नाय का? हे विडंबन गीत म्हणण्यात आले. या गाण्यातून शहरातील रस्त्यांच्या विदारक स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे.
नागपूरच्या रस्त्यात झोल झोल, रस्त्यातले खड्डे खोल खोल, लोकांचा पैसा माती मोल, नागपूर तुला एनएमसीवर भरोसा हाय का? असा प्रश्न या विडंबन असलेल्या गाण्यातून विचारण्यात आला.
नागपूर सिटिझन्स फोरम जुलै महिन्यापासून उंगली दिखाओ आवाज उठाओ अभियान राबवित आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शहरातील नागरी समस्यांकडे बोट दाखवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न फोरमने केला.
शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांचा प्रश्न या अभियानातून प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न केल्याचे या अभियानाचे संयोजक रोहित कुंभारे यांनी म्हटले आहे.
खड्ड्यांच्या समस्येविषयी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने देण्यात आली.
मात्र प्रशासनाने थातूरमातूर काम करुन काही खड्डे बुजवले. आजही अनेक रस्ते असे आहेत ज्याठिकाणी स्थिती तशीच आहे.
अनेक ठिकाणी कोल्ड मिक्स च्या माध्यमातून खड्डे बुजवण्यात आल्याने बारीक गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. यामुळे अपघात वाढले असून दुचाकी स्वारांना दुखापत होत आहे.
यातच शहरातील खड्ड्यांबाबत महानगरपालिका प्रशासन, स्थायी समिती व पदाधिकार्यांनी चुकीची माहिती देत दीशाभूल केली आहे, असे सिटिझन्स फोरमचे अभिजीत झा म्हणाले.
यावेळी अभियानाचे संयोजक रोहित कुंभारे व प्रतिक बैरागी यांच्यासह अमित बांदूरकर, अभिजीत झा, अभिजीत सिंह चंदेल, वैभव शिंदे पाटील, प्रजावल गोड्डे, शिवम उमरेडकर, रजत पडोळे, तेजस पाटील, संकेत महल्ले, संदीप पटले, रुपेश चौधरी, अथर्व काकडे, लिखित राउत, मिहिर पेलणे, संदेश उके, अमेय पन्नासे, हेमंत शाहू आदी सदस्य उपस्थित होते.