महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महिला संरक्षण कायद्यामुळे महिलांना न्याय मिळाला आहे. महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याविषयीच्या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे. तसेच राज्यभर कुपोषित बालकांची शोधमोहीम व जनजागृती चळवळ वर्षभर लोकसहभातून नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे राबविली जात आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद मार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या जनजागृती लघुपटाचे विमोचन व बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी तयार केलेल्या चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टीमचे अनावरण महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निर्मला पानसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या.