नागपूर:कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब प्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. कर्नाटक हायकोर्टमध्ये सुरू असलेले प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करून सुनावणी करावी अशी याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) तातडीने सुनावणी करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.
याचिकाकर्त्यांपैकी एका विद्यार्थिनीच्यावतीने ऍड.कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी व्हावी यासाठी त्यांनी अनेक कायदेशीर दाखले दिले. मात्र, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी ही स्पष्ट शब्दात नकार देताना म्हटले की, हायकोर्टात या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणात का उडी घ्यावी? आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करावा हे योग्य ठरेल का? असा प्रश्न विचारला. आम्ही या प्रकरणाची सुनावणी सुरू केल्यास हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याचे सांगितले जाईल. कपिल सिब्बल यांनी कायद्याचे अनेक दाखले दिले. मात्र, कोर्ट त्यावर राजी झाले नाही. कर्नाटकमध्ये काय सुरू आहे, याकडे आमचं लक्ष असून योग्य वेळी सुनावणी घेऊ सरन्यायाधीशांनी म्हटले.
त्याशिवाय या प्रकरणावरील पुढील सुनावणीची तारीख देखील निश्चित केली
गुरुवारी न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा होणार आहे. हिजाबवरून झालेल्या वादामुळे कर्नाटकातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कर्नाटक हायकोर्टाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. हायकोर्टाने म्हटले आहे की, शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करावीत. तसेच पुढील निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी कोणतेही धार्मिक पोशाख घालू नये. राज्यात शांतता राखली पाहिजे, असेही म्हटले.