फडतूसांना हिरो करणारे मोठेमोठे अर्ध्या तासांचे खोटे कार्यक्रम दाखवणं बंद करा
मुंबई/ सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसापासून भारी मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेनेच आमदार बंड पुकारत असल्यामुळे सरकार अडचणीत आलंय. यामुळे वृत्त पेपर. वृत्त वाहिन्या सगळे जण राजकारणात काय गुंतागुंत चालू आहे हे दाखवण्यात व्यस्त आहेत. अशातच सीमेवर लढणाऱ्या एका वीर जवानाला वीरमरण आल्याची चुटुकभर बातमी दाखवून सगळे मोकळे झाले असे अनेकांचे म्हणणे आहे. अशातच आता बेधडक बोलणारे किरण माने सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत आणि मीडियावर संतापून त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, न्यूज चॅनलवाल्या माझ्या मित्रांनो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला मालकाचे आदेश असतात. पण आता लै बील झालं. पळपुट्या गद्दारांना आणि त्यांच्यावर करोडो रूपये खर्च करणार्या “फडतूसांना हिरो करणारे मोठेमोठे अर्ध्या तासांचे खोटे कार्यक्रम दाखवणं बंद करा.” आमच्या सातार्याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद झालाय. जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये आपल्या आर्मीचं ‘ऑपरेशन रक्षक’ सुरू असताना, जवान सुरज शेळके याला वीरमरण आलं आहे. फक्त २३ वर्ष वय असलेल्या माणदेशी मातीतल्या, खटावच्या सुपुत्रानं देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्यात. त्याच्यावर एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दाखवा. त्याच्या मित्रांच्या, गांवातल्या लोकांच्या मुलाखती दाखवा. देशासाठी जीव ओवाळून टाकणार्यांची खरी ‘पॅशन’ दाखवा… लोकांना कळूद्या ‘खरे हिरो’ कसे असतात ते… सुरज, तुला कडकडीत सलाम ! जयहिंद. – किरण माने.
शाहिद जवान सुरज प्रताप शेळके हे मूळ साताऱ्यातील वडूजमधील खटाव तालुक्याचे रहिवासी होते. त्यांचे वय अवघे २३ असून फक्त ३ महिन्यांपूर्वीच त्यांची लष्करात भरती झाली होती. देशासाठी आणि देशातील प्रत्येकासाठी ते सीमेवर उभे राहिले. त्यांचं पहिलंच पोस्टिंग लेह लडाखला झालं. यात लष्कराच्या ऑपरेशन रक्षक दरम्यान त्यांना वीरगती आली. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण खटाव परिसरात शोककळा पसरली होती.