नागपूर: भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या होऊ घातलेल्या आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभेने पाठिंबा दिलेला आहे. ते करीत असलेल्या मागण्या न्याय असून प्रत्येक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. या विभागात दीड हजार कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी किसान सभेने केलेली आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये शेती खरेदी विक्री तसेच शेत जमिनी बाबत चे तंटे मोठ्या प्रमाणात होत असून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोजणी केल्याशिवाय यावर कोणताही तोडगा नसतो. पण मोजणी चे पैसे भरून महिनोगणती शेतकऱ्यांना वाट पहावी लागते. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी पूर्ण करून या कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. या दृष्टिकोनातून अखिल भारतीय किसान सभेने या आंदोलनाचे समर्थन केले आहे.