भारताच्या पहिल्या मानवयुक्त सागरी मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी केला. यासह भारत अशा राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला ज्यांच्याकडे सागरी क्रियाकलाप करण्यासाठी पाण्याखालील वाहने आहेत. यावेळी बोलताना सिंह म्हणाले की, देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. जेव्हा एक भारतीय गगनयान कार्यक्रमातर्गत अंतराळात जातो, तेव्हा दुसरा समुद्रामध्ये अंतरिक्षासारखं नवे काही शोधण्याचा प्रयत्न करतो.
मंत्र्याने ट्विट करत म्हटले की, भारताचे पहिले मानवयुक्त महासागर मिशन समुद्रयान चेन्नईत लॉन्च झाले. अशा पाण्याखालील वाहनांसाठी भारत आता अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी सागरी संसाधनांचा शोध घेण्याचा नवा अध्याय सुरु होत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, ‘आपण प्रत्यक्षात जे योगदान देत आहोत ते केवळ वैज्ञानिक कार्याच्या व्याप्तीपुरते मर्यादित नाही तर ते भारताचा राष्ट्रीय सन्मान निर्माण करण्यातही योगदान देईल.’
‘हे तंत्रज्ञान विज्ञान मंत्रालयाला मदत करेल त्याचबरोबर हजार आणि 5500 मीटर खोल समुद्रात पाममेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, गॅस हायड्रेट्स, हायड्रोथर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट्स यासारख्या निर्जीव संसाधनांचा शोध घेण्यासही मदत होईल. मॅनड सबमर्सिबल फिशिंग 6000 (मत्स्य 6000) चे काम पूर्ण झाले असून ते इस्रो, आयआयटीएम आणि डीआरडीओसह विविध संस्थांसोबत सुरु करता येईल,’ अशी माहिती त्यांनी दिली.