मुंबई: महाराष्ट्रात दिनांक १० जून रोजी झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपा यांच्यात रंगतदार लढत साऱ्या राज्याने बघितली. या राज्यसभेच्या निवडणुकीत सेना आणि भाजपाने सहाव्या जागेसाठी आपला चौथा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे या सहाव्या जागेसाठी सेना-भाजप मध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यानुसार अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्ता बसविण्यासाठी आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांनी ‘गद्दारी’ केल्यामुळे सेनेचा ‘दुसरा संजय’ राज्यसभेच्या निवडणूक रणांगणात धारातीर्थ पडला. त्यामुळे हा पराभव शिवसेनेचा चांगलाच जिव्हारी लागला असून, महाविकास आघाडी या निवडणुकीमुळे बैकफूटवर आली आहे.
छोट्या पक्षांनी व अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना आता निधी द्यायचा नाही असे सूतोवाच सेने पाठोपाठ काँग्रेसनेही काल केले होते. त्याच धर्तीवर राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी, राज्याची सूत्रे सेनेचे हातात देतानी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला धोबीपछाड करत राज्याची सत्ता हस्तगत केली होती. आता राज्यसभा निवडणुकीनंतर ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ यानुसार आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. दि २०जूनला होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीतील या तिन्ही पक्षांनी आपआपले बघावे असा निर्वाणीचा निरोप सेनेने सोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेला हवी तशी मदत केली नाही, असा आरोप सेनेच्या काही नेत्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दुसऱ्या ‘संजय’ ला पराजयाचे तोंड पाहायला भाग पाडण्यात हातभार लावला असेही वक्तव्य काही सेना नेत्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तसूभरही तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे विधान परिषदेत काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.