वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालय परिसरात सोमवारी चांगलाच धुमाकूळ उडाला होता. रूग्णालयाच्या वसतीगृहात पहाटेच्या दरम्यान बिबट्याने शिरकाव केल्याचे कर्मचाऱ्यांना दिसून आले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांच्या गडबडीमुळे बिबट्याने खिडकीत धाव घेवून लगतच्या झाडावर उडी मारली. त्यानंतर तो जवळच्याच नाल्यात शिरला. मात्र हे माहित नसल्याने रूग्णालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. वाघ रूग्णालयात फिरत असल्याचे समजून सर्वत्र धावपळ सुरू झाली. एकच गोंधळ उडाला मात्र खरी माहिती समोर आल्यावर रूग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रूग्णालयाचे दरवाजे व खिडक्या बंद करीत वन विभागाला याविषयी माहिती दिली. माहितीनंतर वन अधिकारी, पिपल फॉर अॅनिमल्स तसेच वाईल्ड लाईफ वार्डनच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली.
बिबट्या नाल्यात अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्याचे कोणतेच मार्ग नव्हते. बेशुध्द करणारे दोन इंजेक्शन त्यामूळे वाया गेले. आणखी दोन इंजेक्शनचा मारा केल्यावर एक बिबट्याच्या शरिरावर लागले. बेशुध्दावस्थेतील बिबट्यावर जाळी टाकून अखेर त्याला बाहेर काढण्यात आले.
पशुंचा आश्रय स्थान असलेल्या करूणाश्रमात या दीड वर्षीय बिबट मादीस सध्या ठेवण्यात आले आहे. भूकेल्या अवस्थेतील या मादीवर योग्य तो उपचार झाल्यानंतर तिचे स्थलांतरण करण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल, अशी माहिती जिल्हा वन अधिकारी सेपट यांनी दिली. बिबट्याने दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची चर्चा निराधार असून कोणतेही दुर्देवी घटना झाली नसल्याचे वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी दिली आहे.