मुंबई उच्च न्यायालयाने आदेशाद्वारे मनाई करूनही संप करत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळं एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ दिलेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहलं आहे.
चित्रा वाघ पत्रात लिहतात की, ‘एसटी विलिनीकऱणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे ३५ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार…? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का…? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय,’ असंही वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे.
अजित दादा यांना आपणच कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढाकार घेऊन त्वरित तोडगा काढावा, अशी विनंती चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्र वाघ यांनी ट्विटरवर ते पत्र पोस्ट केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
आपल्याला माहित आहे की, ‘गेले ५ दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत,’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.