नागपूर: नागपूर महानगरपालिकेकडून गणेश उत्सवकरिता काही निर्बंध जाहीर करण्यात आले होते, त्यात एक मुख्य निर्णय म्हणजे गणपतीच्या मूर्तीची उंची हि ४ फूटच्या वर नसावी व विसर्जन हे कृत्रिम तलावातच करता येणार. गणपती मूर्तीच्या उंचीच्या निर्णयावर शहरातील मूर्तिकारांनी आक्षेप दर्शवला होता, “हा निर्णय आमचा व्यवसायासाठी नुकसानदाई असून याला ताबडतोब वापस घ्यावे” अशी त्यांची मागणी होती. या मागणीला समर्थन देत भारतीय जनता पार्टीचे काही नेते महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले, लवकरात लवकर गणेश मूर्तीच्या उंचीचे निर्बंध हटवा अशी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी होती. काही दिवसानंतर दिनांक २१ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदद्वारे जाहीर केले की यंदाचा गणेशउत्सव व दहीहंडीचा उत्सव कोणत्याही निर्बंधांविना होणार. यामुळे सर्व उत्सवप्रेमींमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
२६ जुलै २०२२ रोजी महानगरपालिकेने आपली ९ मुद्द्यांची यादी जाहीर केली,
ज्याद्वारे उत्सवप्रेमींना दिलासा देण्यात आला आहे. यादीतील मुद्दे पुढीलप्रमाणे :-
१) गणेशोत्सव वर्ष – २०२२ करीता गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी रु.२००/- शुल्क पुर्णपणे
माफ करण्यात येत आहे.
२) गणेशोत्सव वर्ष -२०२२ करीता मुर्तीकारांच्या मंडपाकरीताचे शुल्क प्रमुख अग्नीशमन अधिकारी यांच्याकडुन
पुर्णपणे माफ करण्यात येत आहे.
३) गणेशोत्सव वर्ष- २०२२ करीता महापालिकेच्या मंडप उभारणीबाबत उद्यान खाते, मालमत्ता खाते व खाजगी
भुखंडावर आकारण्यात येणारे शुल्क देखील माफ करण्यात येत आहे.
४) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमुर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध २०२२ च्या
गणेशोत्सवाकरीता असणार नाहीत. तथापी गणेश विर्सजन फक्त कृत्रीम तलावामध्येच करावयाचे असल्याने
ज्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमुर्ती ४ फुटापेक्षा जास्त असतील त्यांनी विर्सजनाची व्यवस्था
महानगरपालिका हद्दीच्या बाहेर करावी व तसे संबंधित पोलीस विभागाला कळवून रितसर मिरवणुकीची
परवानगी घ्यावी.
५) घरगुती गणेश मुर्तीसाठी अगोदर २ फुट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती, तरी आता घरगुती
गणेश मुर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतु घरगुती मुर्तीबाबत स्वखुशीने २ फुट उंचीची
मर्यादा पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
६) पुजा आयोजक समिती / गणेश उत्सव मंडळ / व्यक्ति यांनी या गणेश उत्सवामध्ये आरोग्य विषयक उपक्रम
/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि कोरोना, मलेरिया, डेंग्यु हे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक
उपाय व स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. तसेच सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित
करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
७) कृत्रिम विर्सजन स्थळी नागपूर महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येईल.
⠀
८) आगमन व विर्सजन रस्त्यांवर संबंधीत वीज पुरवठादार यांच्या मार्फत वीजेच्या व्यवस्थेबाबत संबंधीत क्षेत्रीय
सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर चर्चा करुन आवश्यक ती सुधारणा (दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येईल.
९) गणेशोत्सव २०२२ करीता मंडप शुल्क माफ करण्यात आले असले तरी सुध्दा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या
अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. (उदा. अग्नीशमन दलाच्या कोडीफाईड शर्ती, अनज्ञापन खात्याच्या अटी
व शर्ती, प्लास्टीक व थर्माकोल बंदीबाबत शासकीय निर्देश इ.)