राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दौऱ्यावर असताना आज सकाळी 7.30 वा त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठवाडा भागात आद्याप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहणी करायला गेले नाहीत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं. “पाहणी केली म्हणजेच सर्व कळते असे नाही, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत, आजही ते गेले आहेत, मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क सुरु आहे. शेतक-यांना काय मदत पाहिजेत, त्याचे निर्णय होत आहेत. जयंत पाटील, शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड हे सर्व गेले आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
आम्ही गेल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते, आख्खा दिवस काम बुडते, तुम्ही गैरसमज पसरवू नका, जिथे पाहणी केली पाहिजेत तेथे केली जाते, असंही अजित पवारांनी दरडावलं.
आजपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत परंतु अद्याप 18 वर्षाच्या आतील मुलांचे लसीकरण झाले नाही या बाबत अजित पवार यांना विचारले असता, 12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण करावं अशी चर्चा आहे. मात्र अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार आहे” असं अजित पवार यांनी सांगितले. परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून, अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
अन्यथा पुणे-नाशिकला फटका
नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. याबाबत अजित पवार म्हणाले , “पारनेर आणि संगमनेर तालुक्यात अशाप्रकारे परिस्थिती बनायला लागली आहे. पुणे आणि नाशिक जिल्हा या दोन तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे, अन्यथा याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो”