राज्यात सर्वत्र सध्या कोरोनाचा काळ आहे. दुसरी लाट ओसरली असे वाटत असले तरी, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कालच पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३ दिवसात कडक निर्बंध लावण्याचे सुतोवाच केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरात उरूस निमित्त प्रचंड गर्दीचा लोट पहायला मिळत आहे. ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याच्या बाहेर, रस्त्यावर, मोकळ्या जागेत जत्रेसारखी दुकाने लागली आहेत. हजारो भाविक इथे नियमांचे उल्लंघन करून जमाव करताहेत.
ताजबाग परिसर येथील मोठा ताजबाग दर्गा परिसराच्या बाहेरील भागात उरुससाठी आलेल्या मुस्लिम भाविकांची प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नागपूर उमरेड रोडवरील ताजबाग परिसरातील ताजुद्दिन बाबांच्या दर्गाच्या बाहेर, रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत छोट्या छोट्या दुकाने लागल्याचे आणि तिथे प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे.
मोठा ताजबाग परिसरात दरवर्षी ताजुद्दीन बाबांचा उरूस पार पडतो. मात्र यंदा कोरोना निर्बंधांमुळे ताजबाग ट्रस्टने उरूस आयोजित केलेले नाही. तरीही त्या ठिकाणी जत्रा सदृश्य दुकाने लागल्या आणि नागपूरसह आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने तिथे पोहोचले आहेत.
दरम्यान, एका बाजूला नागपुरात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धार्मिक स्थळावर नियमांचे उल्लंघन करून उसळणारी अशी गर्दी कोरोनाचा संकट आणखी वाढवणार नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे