विधान भवन हे नाव मिटवून त्याठिकाणी विदर्भ भवन असे लिहणार -प्रकाश पोहरे
नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक दि. १९ एप्रिल २०२२ रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालयात देशोन्नतीचे संपादक व किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात १ मे २०२२ हा काळा दिवस / विदर्भातील जनतेचा विश्वासघात दिवस म्हणून विदर्भातील शासकीय कार्यालयसमोरील बोर्डावर महाराष्ट्र मिटवून/ हटवून त्या जागी विदर्भाचे स्टिकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला व स्टिकर लावताना सर्व नेत्यांनी / कार्यकर्त्यांनी हाताला पायाला व डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून गुलामगिरीची व निषेधाची जनतेपर्यंत माहिती देण्याचा निर्णय ही घेण्यात आला. हे आंदोलन ११ जिल्ह्यात व १२० तालुक्यात यशस्वी करावे अशी विनंती वजा अपील विदर्भातील जनतेला विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे करण्यात आली आहे.
राज्यात ३१ मार्च २०२१ पर्यंत बेरोजगारांची संख्या ४५ लाखांवर होती व कोरोनामुळे २ वर्षात २१ लाख युवक बेरोजगार झाले असून बेरोजगारांची संख्या ६६ लाखांवर गेली आहे. त्यात विदर्भातील बेरोजगारांची संख्या १४ लाख आहे. या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे “महाराष्ट्र हटाव, विदर्भ मिलाव” हेच आहे. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी विदर्भ प्रदेश महासचिव मितीन भागवत, सचिव राहुल खारकर, पूर्व गडचिरोली जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष ग्यानचंद सहारे, पूर्व अमरावती जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष म्हणून गणेश कुसराम तसेच किशोर कुंजेकर यांची अध्यक्ष कुही तालुका म्हणून कोअर कमिटीच्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कोअर कमेटी सदस्य प्रकाश लड्ढा, तात्यासाहेब मते, सुनीता येरणे, रेखा निमजे, सुनील वडस्कर, प्रा. पुरुषोत्तम पाटील, सुयोग निलदावार, माजी अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामूने, डॉ. रमेश गजबे, इंजि. भूषण राऊत, यादव, सुरेश वानखेडे, राजेंद्र आगरकर, नीलिमा सेलोकर, देविदास लांजेवार, राजेंद्रसिंग ठाकूर, कृष्णराव भोंगाडे, किशोर दहेकर, विनोद भांवरे, कपिल इहे, वृषभ वानखेडे, नासीर शेख, ओमप्रकाश तापडिया, दिलीप भोयर, गुलाबराव धांडे, उल्हास कोटमकर शिवाय सर्व पदाधिकारी उपस्थित होते.