नागपूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना काळानंतर म्हणजे दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय दहीहंडी आणि गणेशउत्सव साजरा केला जाणार. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रताप सरनाईक यांनी निवेदन पाठविले होते. यामध्ये आमदार या नात्याने गेली अनेक वर्ष मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होत. अखेर आमदारांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
“गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्ह्हाधिकारी जाहीर करतात पण मी मुख्य सचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे, ” असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.