राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयातर्फे कोठडी सुनावण्यात आली आहे. 3 मार्च पर्यंत मलिक यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण आठ दिवस नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात असणार आहेत. या काळात नवाब मलिक यांना घरून जेवण देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
नवाब मलिक यांच्यातर्फे वकील अमित देसाई यांनी कोर्टात युक्तिवाद केला तर अनिल सिंग यांनी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. ३ मार्च पर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत असणार आहेत. या संपूर्ण काळात ईडीच्या माध्यमातुन मलिक यांची मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात चौकशी होणार आहे.
दाऊदची बहीण हसीना पारकरचा साथीदार सलीम पटेलने मुनिराच्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत तिची मालमत्ता पारकरच्या नावे केली. पारकरने ती मलिक यांना विकली. त्यामुळे मलिक यांचाही गुन्ह्यात सहभाग आहे असा दावा ईडीने न्यायालयात केला. ईडीने मलिकांची १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली. पण न्यायालयाने मलिकांना ८ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मलिकांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेते मात्र राजीनामा घेणार नसण्यावर ठाम आहेत.