सिलवासा: केंद्रशासित प्रदेशात असलेल्या दादरा नगर हवेली, दीव आणि दमन या बहुभाषिक आदिवासी बहुल ‘सिलवासा’ शहरात मराठी महिला मंडळाच्या वतीने दि. ८ मार्च रोजी प्रमुख वाटीका हॉलमध्ये दुपारी ४.०० वा. ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून मराठी महिला मंडळातर्फे ‘स्त्रीला समजून घेणे’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
मराठी महिला मंडळाच्या अध्यक्षा राही देशपांडे व आयोजक अर्चना सरोदे, प्रमुख पाहुण्या व वक्ता डॉ मीना कुटे व प्रमुख अतिथी मार्गदर्शक कार्यकारी संपादक व समीक्षक सविता पाटील ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचे स्मृतीचिन्ह, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुप्रसिद्ध कवयित्री अर्चना सरोदे यांचा ‘निखारा’ कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मराठीचे शिलेदार प्रकाशन, नागपूरतर्फे काढलेला ‘साहित्यगंध’ दिवाळी अंक संपादिका सविता पाटील ठाकरे यांच्या हस्ते डॉ मीना कुटे यांना भेट देण्यात आला. साहित्यगंधच्या मुखपृष्ठावर असलेल्या चित्रातील कु. अंकिता ठाकरे, सिलवासा हिचेही याप्रसंगी कौतुक करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या डॉ मीना कुटे यांनी ‘स्त्री समजून घेतांना’ या विषयावरील आपल्या व्याख्यानात महिलांच्या विविध समस्या यावर उपाय व निराकरण यावर प्रकाश टाकतांना त्या म्हणाल्या की, स्त्री ही कोणत्याही जातीची नसते. मुलांच संगोपन, शि-शू काढताना ती शुद्र असते, त्याला स्वतःचे रक्षण करणे शिकवताना ती क्षत्रिय असते, त्याला शिक्षण देताना ती ब्राह्मण असते आणि त्याला जमाखर्च शिकवताना ती वैश्य असते.
तर प्रमुख मार्गदर्शक सविता पाटील ठाकरे यांनी स्त्रीयांच्या जडणघडणीत पुरूषांचाही वाटा तितकाच महत्वाचा असला तरी, स्वंयसिद्ध होण्यासाठी प्रत्येक संकटाचा सामाना करण्यासाठी सक्षम होणे गरजेचे असून, त्याकरीता आत्मविश्वास व निश्चय निर्माण करणे आज खरी गरज असल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्यात, की समाजातील मानाच पान म्हणजे स्त्री.प्रत्येक कुटुंबाचा कणा, ताठ बाणा आणि संकटांच्या वेळी विवेकाने केलेला सामना म्हणजे स्त्रीचे कौशल्य. आजची स्त्री ही अबला नसून सबलाच आहे, तलासरीच्या महिला कैब चालकांची उदाहरण देऊन त्यांच्या समस्यांची जाणीव प्रत्येकास असावी. धैर्यशील कर्तृत्वान महिलाच संपूर्ण जगताचा उद्धार करू शकते असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
मराठी महिला मंडळातर्फे आयोजित व्याख्यानमालेत संस्थेच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन पद्मजा देशपांडे यांनी केले, तर आभार पल्लवी डेंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी महिला मंडळाच्या फाउंडर सौ.अनिता जोशी, कोषाध्यक्षा सौ. सुनिता राव, सचिव सौ.पद्मजा देशपांडे व सौ.स्नेहा जरीपटके, कार्यकारिणी सदस्या अर्चना सरोदे, साधना जरीपटके, शरयु ठाकूर, जयश्री भोळे, ममता भोळे, रीना भदाने, अनिता गायकवाड अतुलनीय सहकार्य केले.