आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मांना अभिवादन केलं. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक योजनांचा पाढा वाचून दाखवत एमआयएमला प्रत्युत्तर दिलं आहे.
पुढे यामध्ये ज्यामध्ये औरंगाबाद येथे संतपीठ स्थापन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसंच, निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. परभणी वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. संभाजीनगर आणि मराठवाडा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं शिर्डी आणि औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान, या आधी परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र, अनेक वेळा आंदोलने करुन देखील परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाले नाही. परभणीची मागणी असून देखील उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्याने परभणीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्याच सरकार विरोधात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला यश आले असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनामित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घाेषणा केली आहे.